मैत्रिणी




पहाटे उठून मोठ्या आईने परसदारीच्या चुलीवर मुंबऱ्याचं गोड बनवलं. नारळाच्या दुधाचा, गुळाचा, वेलचीपुडीचा खमंग वास दरवळला. ठीक नऊ वाजता स्नेहांजलीआश्रमाच्या भेटण्याच्या वेळेत आम्ही दोघी माझ्या दुचाकीवरून निघालो. दरवर्षी १४ फेब्रुवारीला हा आमचा सकाळचा कार्यक्रम ठरलेला.

सिस्टर  ग्रेटाने दरवाजा उघडताच मोठ्या आईने मुंबऱ्याचं गाठोडं तिच्या स्वाधीन केलं. योग प्राणायामचं सत्र चाललं होतं. कोणी बसून तर कोणी चटईवर झोपून आपापल्या परीने योगसाधना करीत होत्या. टीना मावशी दिसली. ती ताठ कण्याने पद्मासनात बसून डोळे मिटून दीर्घ श्वास घेत होती. चंदेरी केसांचा स्मार्ट बॉब, सडपातळ शरीरयष्टी, स्टॅन्ड कॉलरचा खास फिटिंगचा शिवून घेतलेला मोरपिशी खादी सिल्कचा कुर्ता. तिला नाही आवडत दिवसभर नाईट गाऊन घालायला.

टीना मावशी मोठ्या आईची सर्वात मोठी बहिण. लग्नानंतर फ्रान्सिस मावश्यांच्या बरोबर त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने कॉटन ग्रीनला राहायची. लहानपणी आम्ही तिच्या घरी गेलो की आग्रहाने हातावर पैसे ठेवायची. तशी आपली रीत आहे म्हणायची. दोघांचा छोटा संसार एकदम आटोपशीर होता. तसं त्यांनी कधी दाखवलं नाही तरी त्यांना निपुत्रिक असल्याचं दुःख असेलच. वय झालं तसं त्यांनी पुढची व्यवस्था करून ठेवली होती. वसईला असलेले घर जागा कॉन्व्हेंटला वृद्धाश्रमासाठी दान केली. नातेवाईकांना कमीजास्त इस्टेट मिळाल्याची भानगडच मिटली. पण फ्रान्सिस मावशे सगळे नियोजन पाहण्यासाठी राहिले नाही. टीना मावशी त्यांच्या निधनानंतर लगेचच सावरली स्नेहांजली आश्रमामध्ये स्थलांतरित झाली. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तिला आश्रमातल्या समवयस्क मैत्रिणींची साथ लाभली.

आम्हाला बघताच टीना मावशी आनंदली. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आम्ही तिची विचारपूस केली.

"चला तुम्हाला माझ्या नवीन मैत्रिणींशी ओळख करून देते" असं म्हणत एखाद्या होस्टेलला राहणाऱ्या मुलीच्या हौसेने आमचे हात पकडून ती आम्हाला बगिच्यात घेऊन गेली.

ग्रॉटो जवळच्या धबधब्याशेजारी एका बाकावर कोवळ्या उन्हात दोन नवीन चेहरे दिसले. दुरूनच त्यांच्याकडे बोट दाखवून टीना मावशीने माहिती पुरवली,

"ते बघा, ती सोनेरी काठाचा चष्मा घालून गोष्ट वाचून दाखवत आहे ना ती स्टेला. मँगलोरियन आहे. शिक्षिका होती. निवृत्त झाल्यावर अविवाहित असल्यामुळे इथे आली. कुटुंबीय म्हणतात तिला आता तितकंसं 'धेन' नाही. कधी कधी खांबावरूनच वीज जाते ना तसाच प्रकार आहे म्हणतात. मला खूप आवडते ती - सगळ्यांना हसवते आणि स्वतःही भरपूर हसते. तिच्या शेजारी बसली आहे ती आगथा.  आपल्या वसईचीच. परवाच आली पण तोंडातून चकार शब्द नाही काढत. दुःखी मावली आहे. रुळेल इथे हळू हळू."

आम्ही जवळ गेलो ते आगथाच्या लक्षात आले पण  तिनं  काहीही प्रतिक्रिया दाखवली नाही. ती जवळजवळ टीना मावशीच्याच वयाची होती. खेचून मागे बांधलेला काळ्या कुळकुळीत केसांचा गच्च आंबाडा, कपाळावर एकही सुरकुती नाही आणि ओठांवर स्मितरेखेचा लवलेश नाही. डोळ्यात शिकाऱ्याने हेरलेल्या हरिणीसारखा भाव, मख्ख चेहरा, आणि अबोला.  आयुष्यात काहीतरी फार अनपेक्षित घडल्यासारखं तिचं एकंदर वागणं. कदाचित तिच्या इच्छेविरुद्ध तिला इथे आणलं असेल का? कोडंच होतं ते. सिस्टरांना माहिती असेल सगळं पण आम्ही विचारणं बरोबर नव्हतं. 

आमची सावली पुस्तकावर पडताच स्टेलाने वर पहिले मुक्तपणे हसली. उठून "वेलकम " म्हणत कडक हस्तांदोलन केले. माझ्या जुनाट टी शर्टवरच्या शब्दांनी तिचे लक्ष् वेधले. हळूहळू एकेका शब्दावर बोट ठेवून ती वाचू लागली - "Not all those are lost.” क्षणभर विचार करून ते वाक्य पुन्हा वाचत स्टेला जोरात दिलखुलास हसली. “Not all those are lost. हा हा हा!"  

आम्ही गोंधळलो. वाक्य अपूर्ण होतं. बरोबरही नव्हतं. तिला त्याचा अर्थबोध झाला नसेलच. कसा होणार? खरंतर तिथे जे. आर. आर. टॉलकिन नावाच्या लेखकाचे शब्द लिहिले होते - 'Not all those who wander are lost'. पण त्यातील दोन शब्द - 'who wander' हे फिकट झाल्याने स्टेलाला दिसले नसतील कदाचित. मी तिला तसं सांगायचा प्रयत्न केला पण ती ऐकायला तयार होईना. शेवटी मीही सोडून दिले. माझी धांदल पाहून मोठी आई टीना मावशीची करमणूक झाली.  

स्टेला पुन्हा पुन्हा स्वतःशीच पुटपुटत हसत राहिली, "Not all those are lost. हा हा हा!"

"हॅपी बर्थडे टू यू, डिअर वॅलेंटिना" असं सगळ्यांनी गायल्यावरटीना टीनामावशीने मेणबत्तीवर फुंकर घातली मुंबरं कापून दात असलेल्या- नसलेल्यांना वाढलं. सिस्टर ग्रेटाने आग्रह केला म्हणून त्यांनी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये आम्हीही एक दोन खेळ खेळलो. आगथा वगळून सगळ्यांनी खेळात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. व्हीलचेअरवर बसणाऱ्यांनीही खो -खो चा डाव मांडला.

आश्रमाची भेटण्याची वेळ संपत आली म्हणून आम्ही जायला निघालो. टीना मावशी थेट दारापर्यंत सोडायला आली. स्टेला  आगथा पुन्हा ग्रॉटो जवळच्या बाकावर बसल्या होत्या. स्टेलाचं "Not all those ... " चालूच होतं. तिनं त्यातून काहीतरी विनोदी अर्थ काढला होताच. तोच ती आगथाला मिस्किलपणे समजावत होती. तरीही आगथा मूकच. उत्साह हरवलेली.  केविलवाणी.

स्टेलाचा प्रसन्नतेचा प्रकाश मात्र इतका प्रखर होता की तिथे कोणत्याही प्रकारचं दुःख पोहोचू शकत नव्हतं. निघता निघता तिला तसं पाहून जे. आर. आर. टॉलकिनच्या कवितेच्या बाकीच्या ओळी मनात घोळू लागल्या ...

All that is gold does not glitter,


Not all those who wander are lost;


The old that is strong does not wither,


Deep roots are not reached by the frost.


लखलखत नाही सुवर्ण सर्वदा


भटकणारे सगळेच हरवत नाही


कोमेजत नाही कधी सशक्त जीर्णता


सखोल मुळांपर्यंत हिम पोहोचत नाही


***
This story was also published in Suvarta, March 2020.

Comments

Popular posts from this blog

दिल गुलदस्ता