दिल गुलदस्ता
आपल्या वसईला अलीकडे लग्नाचा मोसम असला म्हणजे एक औरच माहौल असतो. मंडपात मूड लाईट्स काय , डी. जे. काय, उभी लुगडी काय, रशियन सॅलड काय… ‘थीम’ नुसार साड्या नि सुटाबुटाचं तर सांगायलाच नको. अहो, मंडपातल्या खुर्च्याही रेशमी ड्रेस घालून सज्ज असतात.
असाच एक सोहोळा आठवला. माझ्या खास मित्राचे लग्न आणि मी फोटोग्राफर.
फ्रेडीने आयुष्यात पहिल्यांदाच दाढीमिशी वाढवायला घेतली तेव्हा कुठे आम्हा मित्रपरिवाराला त्याचे लग्न ठरल्याचे कळले. तसा आमचा फ्रेडी आमच्यासारखाच गबाळा. ऊंच शरीरयष्टी, डोळ्यांवर चष्मा, अभ्यासू, पण व्यवहारशून्य. पण कॉलेजच्या शेवटच्या वर्षी आम्ही हा मित्र कायमचा गमावला. तो रेचलच्या प्रेमात इतका डुंबला की ती म्हणेल ती पूर्व दिशा. तिला लग्नाच्या दिवशी तिचा वर दाढीमिशीवाला रुबाबदार हवा होता. झालं, लेकाने लगेच प्रस्ताव अमलात आणायला सुरवात केली. असो, त्याच्या सुखाला!
रेचलने लग्नाच्या पूर्वतयारीसाठी खूप मेहनत घेतली. तिनंच फ्रेडीचा व दोन्ही कुटुंबांचा होकार घेऊन थीम ठरवली – ‘दिल गुलदस्ता’. तिचं म्हणणं म्हणजे विवाहित जीवन हे एकमेकांना दिलेले आपल्या हृदयाच्या पुष्पगुच्छाचे अर्पण असते.
लग्नाच्या दिवशी फ्रेडी दाढीमिशी ट्रिम करून अतिशय राजबिंडा दिसत होता. त्याने चक्क लाल, पिवळ्या, गुलाबी, जांभळ्या रंगाच्या फुलांच्या नक्षीकामाची टाय घालायला काढली तेव्हा मित्रपरिवारात हशा पिकला. फ्रेडीचा चेहरा गोगलगायीसारखा झाला.
चर्चमध्ये थांबलो असता स्वप्नातून उतरल्यासारखी रेचल आली. पांढऱ्याशुभ्र ड्रेसवर नाजूक सफेद फुलांचे नक्षीकाम, आखूड कुरळ्या केसांवर फुलांचा मुकुट, हातात सुगंधी टवटवीत टपोऱ्या गुलाबांचा भलामोठा पुष्पगुच्छ. गुलाबांचे रंग बरोबर फ्रेडीच्या टायला मॅच होणारे. रेचल दिसताच अचानक फ्रेडी गोगलगायीचे रूप पालटून हसरा जिराफ झाला. त्या दोघांना एकत्र पाहून अनेकांच्या दिलाचे गुलदस्ते झाले.
मी कॅमेऱ्यामागून एकेक सुखद क्षण टिपत होतो. देवळात मिस्सा चालू असताना वेदीवर फोटोग्राफर्सना इथून तिथे नाचायची परवानगी नसते म्हणून झूम लेन्सने वचने घेण्याचे फोटो घेतले. अंगठ्या घालण्याच्या प्रसंगात बेस्ट मॅन, आमचाच मित्र तो, उजव्या डाव्या खिश्यात चाचपडू लागला. झूम लेन्स मधून पाहता मला उगीचच वाटलं की नवरीने त्या क्षणाला किंचित डोळे वटारले. असो. सगळेच फोटो छान आले होते. पाश्च्यात्य देशात प्रथा असते तशी नवरीने तिच्या मैत्रिणींना डोक्यावरून मागे पुष्पगुच्छ फेकण्याचा शॉट तर अप्रतिम आला होता. गुच्छ फेकताना सगळी फुलं सुटून विखुरली व कुणा एकीला गुच्छ मिळण्याऐवजी सगळ्या मैत्रिणींना एकेक विविध रंगाचे फूल मिळाले.
दोन आठवड्याने मी लग्नाचा आल्बम घेऊन फ्रेडीकडे गेलो. रेचल माहेरी गेल्याचे कळले म्हणून मी सवयीनुसार थेट त्याच्या खोलीत शिरलो. त्याच्या हातात आल्बम देतो इतक्यात त्याला तिचा फोन आला. क्षणाचाही विलंब न लावता तो फोन घेऊन गच्चीत धावला. म्हटलं असेल काहीतरी गुलुगुलु बोलायचं. तेवढंच त्याला चिडवायला कारण.
"काय रे, मी आलोय म्हणून गच्चीत पळालास काय?"
"तसं नाही रे, तिचा व्हिडिओ कॉल होता नं ..."
"हे बघ, तुला स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाहीये. नवीन लग्न आहे. समजलो मी समजायचे ते."
त्याचा चेहरा पुन्हा गोगलगायीसारखा.
"ऊठ."
"काय रे, थट्टा केली मी थोडी. रागावलास का?"
"नाही रागावलो. उठ."
"अरे पण, ..."
त्याने खेचतच मला पलंगावरून उठवलं. लग्नानंतर मित्र बदलतात हे ऐकून होतो पण थोड्याश्या थट्टेवरून हे असं वागणं?
मी बाजूला होताच त्याने पलंगावरची बेडशीट खसकन ओढली. कपाटात व्यवस्थित घडी करून ठेवलेल्या बेडशीट्स मधून एक निळी बेडशीट काढली.
"बघतोस काय? खोचायला मदत कर. आता थोड्या वेळाने रेचल येईल आणि म्हणेल, "काय? तीन दिवस झाले त्याच बेडशीटवर झोपतोस का?" म्हणून तिचा व्हिडिओ कॉल आला की मी गच्चीत पळतो. मित्रा, खरं सांगतो, ह्या बायकांची दहशत असते नुसती. टॉवेलचंही तेच. मी काय म्हणतो, अंघोळ केल्यावर आपण आपलं स्वच्छ शरीर टॉवेलने पुसतो की नाही? मग तो दररोज धुवायची काय गरज आहे? पण नाही…"
मी आपला सहानुभूती दाखवत मुकाट्याने बेडशीट खोचत होतो.
"अरे थांब, हे कोपरे आहेत ना ते असे दुमडून खोचायचे असतात. तू हॉस्पिटल मध्ये पाहिले असशील ना? त्याला ‘हॉस्पिटल कॉर्नर्स’ म्हणतात."
मी आ वासून फ्रेडीकडे पाहत राहिलो. जन्म गेला होता लेकाचा अस्ताव्यस्त बिछान्यावर झोपण्यात. लग्न झाल्यापासून त्याच्या ज्ञानात कमालीची भर पडली होती.
*
आठ वर्ष झाली ह्या गोष्टीला. मी व्यवसायात रमल्याने फ्रेडीकडे जाणं येणं नव्हतंच. बाजारात, देवळात वरवरून भेटायचो तेवढंच. दुसरे मित्रही लग्न करून आपापल्या मार्गाला लागले होते. शेवटी घरच्यांनी माझंही लग्न ठरवलं तेव्हा आमंत्रण देण्यासाठी फ्रेडीकडे गेलो.
"गुड मॉर्निंग, अंकल!" म्हणत फ्रेडीच्या मुलीने दार उघडलं. ती धाकट्या भावाबरोबर x आणि o चा खेळ खेळत होती. घर अगदी टापटीप. एखाद्या वस्तुसंग्रहालया सारखे.
आमंत्रण घेण्यासाठी फ्रेडीने हात पुढे केला.
"अहं, तुला एकट्याला नाही देणार. रेचल कुठे आहे? दोघांची भेट व्हावी म्हणून तुझ्या घरी खास शनिवारी आलोय."
फ्रेडीने खिडकीबाहेर बोट दाखवले. रेचल धुणं वाळत घालत होती.
"काय रे, किती काम करत असते ती. तू काही हातभार लावत नाहीस का?"
फ्रेडीने कपाळावर हात मारला.
"अरे, सुट्टीच्या दिवशी धुणं मीच वाळत घालतो. नीट बघ, मी वाळत घातलेला एकूण एक कपडा ती पुन्हा तिच्या तऱ्हेने वाळत घालत आहे."
"खरंच रे."
फ्रेडी रेचलकडे कौतुकमिश्रित प्रेमाने पाहत होता.
"सुरुवातीला खूप भांडलो. आता सवय झाली आहे. माझेही स्वभावदोष आहेतच म्हणा. स्वभावाला इलाज नसतो म्हणतात. तुला माहितच आहे मी कामाच्या बाबतीत किती आळशी आहे ते. म्हणूनच ईश्वराने रेचलसारखी पत्नी माझ्या आयुष्यात पाठवली असेल. आणि तसं पाहिलं तर विवाहित जीवन म्हणजे x आणि o चा खेळच असतो नाही का? कधी मी बरोबर तर कधी ती. आणि कुणीही जिंकलं हरलं तरी x आणि o ला त्याच चौकटीत राहायचं असतं. दुसऱ्या दिवशी नवीन खेळ मांडण्यासाठी" तो मिशीला पीळ देत म्हणाला.
त्याच्या मागे भिंतीवर त्यांच्या लग्नातला 'दिल गुलदस्ता' थीमचा मोठा फ्रेमबंध फोटो होता. कालपरवाच घेतल्यासारखा. गुलदस्त्याचा सुगंध अजूनही घरभर दरवळल्यासारखा.
***
This story was also published in Suvarta, Christmas 2019.
This story was also published in Suvarta, Christmas 2019.
Comments
Post a Comment